स्पर्श
ती बसून होती तशीच.. तसा बराच वेळ झाला होता. बाहेर अंधारून आलं होतं. रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. क्वचितच कधीतरी एखाद्या गाडीचा हॉर्न वाजत होता. एखादी सायकलही मधून मधून जात होती. खिडकीबाहेर बघण्याची तिची इच्छा नव्हती. घरातही तिचं फारसं मन लागत नव्हतं. काय करावं तिला कळत नव्हतं. विचारात मग्न असतानाच आवेगाने तिने रेकॉर्ड चालू केली... त्या सुरांनी अवघं वातावरण भारून गेलं. खरंतर ती तिची आवडती बंदिश होती. सहज काळजाला हात घालणारी.. मनाला भिडणारी - पिया समजाऊ समझत नाही साँस ननन्द मोरी देगी गारी पायलिया झनकार मोरी झनन झनन बाजे झनकार समेवर येऊन बंदिश संपली. रेकॉर्ड सुद्धा सांगकाम्याप्रमाणे थिजली. पण.. पण ती मात्र.. ती मात्र डोळ्यात जमा होऊ पाहणाऱ्या अश्रूंना प्रयत्नपूर्वक थोपवत होती. मनालाच विचारत होती - का? हे सगळे भोग माझ्याच नशिबात का? मनाचाही बांध फुटला. डोळ्यात साठलेल्या अश्रूंना वाट करून देत ती ही मोकळी होऊ लागली. रडल्याने मन मोकळं होतं असं म्हणतात. मनात साठलेल्या सगळ्या भावनांना वाट करून दिली की मन कसं हलकं होतं. छे ! खोटं आहे हे.. उलट रडल्यामुळे त्याच भावनांची पुनःपुन्ह...