प्रिय सखे - ३

बराच वेळ तिच्या उशाशी बसून होता तो. मगाशी डॉ. अक्षत गुप्ता म्हणाले ते शब्द त्याच्या कानात वाजत होते, 'शी इस इन कोमा'. त्याच्या मनाची खूप घालमेल होत होती. असे कसे काय आपण हलगर्जी पणा करू शकतो. समोरून येणार एवढा मोठा ट्रक आपल्याला दिसू नये? वीणा च्या या अवस्थेला तो सर्वस्वी स्वतःला जबाबदार धरत होता.

निरनिराळ्या ठिकाणी नळ्या घुसवलेलं तिचं ते निपचित पडलेलं शरीर बघून तर त्याला अजूनच स्वतःचा राग येत होता. 'वीणा, उठ ना गं, नुसतं बघ तरी माझ्याशी, काहीतरी बोल माझ्याशी, तो एकदम आसुसल्याप्रमाणे बोलत होता. खरंतर त्यालाही खूप लागलं होतं, खूप अशक्तपणा आल्याने तोही एकदम शांत झाला. शांत बसल्यावर मागची दोन वर्ष अगदी सहजपणे त्याच्या डोळ्यासमोरून तरळत जात होती.

सुमारे दोन वर्षांपूर्वीची गोष्ट होती ती. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होता तो. त्याची टीम फिरोदिया करंडक ची तयारी करत होती. मागची सलग दोन वर्ष ‘द कौस्तुभ राज्याध्यक्ष’ लिखित कथानकामुळे त्याची टीम फिरोदिया मध्ये अव्वल क्रमांकावर होती. आता या कॉलेजच्या विश्र्वात स्वतःच एक वेगळं नाव निर्माण करण्याचं त्याच शेवटचं वर्ष होतं, आणि या वर्षात सुद्धा त्याला करंडक जिंकायचंच होतं. खूप मनापासून तयारी करायची हे मनाशी पक्क करून तो त्याची टीम निवडणार होता. आज ऑडिशन चा दिवस होता. नवीन नवीन हरहुन्नरी विद्यार्थी ऑडिशन साठी आले होते, आणि त्या भल्या मोठ्या रांगेत सुद्धा एका मुलीने त्याची नजर पूर्णपणे वेधून घेतली होती.

खूप वेगळी होती ती मुलगी. जीन्स, शॉर्ट्स च्या युगातही तिने सुंदर असा जर्द पिवळ्या रंगाचा पटियाला ड्रेस घातला होता. त्याची सुंदर नक्षीदार ओढणी एका बाजूने पूर्णपणे हातावर आली होती, आणि दुसऱ्या बाजूने मात्र ती तिच्या खांद्यावर असल्यामुळे तिचा कुर्ता स्लिव्हलेस आहे हे दिसत होतं. त्या स्लिव्हलेस कुर्त्यामधून तिचे हात खूपच मादक दिसत होते. तशी काही ती गोरी वैगेरे नव्हती; सावळीशीच होती. नाही नाही, सावळी नाही, कृष्णवर्णी होती ती. अगदी त्या कृष्णासारखी. तिची साधी राहणी कोणालाही तिच्याकडे अजून ओढून घेईल अशी होती. केस काळेभोर, तिच्या कमरेपेक्षा हि मोठे असावेत. त्याची सुंदर वेणी घातली होती तिने. त्या वेणीमधूनही कपाळाशी, कानाशी सुंदर वेटोळे घेणाऱ्या बटा बाहेर पडल्या होत्या. नटीची उपमा द्यायचीच झाली तिला, तर अगदी मधुबाला सारखी दिसत होती ती.

तो बघतच राहीला तिच्याकडे. ऑडिशन द्यायलाच आली होती ती. जशी दिसायला सुंदर होती, अगदीच तशी कामाला हि अगदी चोख होती. तिची ऑडिशन बघून तर कौस्तुभ एकदम चकित झाला होता. काहीही न बोलता त्याने तिला सिलेक्ट केलं होतं. तीच त्या दोघांची पहिली भेट होती!

त्यानंतर जसं जसं ते दोघं एकमेकांसोबत काम करू लागले, तिचं वागणं, नाजूक आवाजात मोजकंच बोलणं, काम अगदी चोख करणं, सगळं अगदी त्याला आवडू लागलं होतं. हे नक्की काय होतंय हे त्याला समजत नव्हतं, पण तिच्यासोबत असताना, तिच्याशी बोलताना नेहमी खुश असायचा तो. ती मात्र कमीच बोलायची, काम नसेल तर बोलायचीच नाही म्हणा ना. जिथे बाकीच्या मुली सतत मोबाईल घेऊन बसायच्या, तिथे ती रिकाम्या वेळात फक्त पुस्तक वाचायची. लिहायची पण खूप छान. पण तिला कौस्तुभच्या लिहिण्याबद्दल मात्र खूप कौतुक होतं. फार बोलायची नाही ती त्याच्याशी, आणि जेव्हा बोलायची तेव्हा फक्तं त्याच्या लिखाणाचं कौतुक करायची. त्याला मात्र तिच्याशी बोलायला खूप आवडायचं. हळू हळू खूप चांगली मैत्री झाली त्यांच्यात. कॉलेजनंतरचा बराचसा वेळ दोघे सोबत असायचे. ती हि त्याच्याशी खुलून बोलायला लागली.

करंडक पार पडलं. आणि अर्थातच कौस्तुभ च्या कथानकाला बक्षीस मिळालं. आणि... आणि एक विशेष बक्षीस पण मिळालं, ते वीणाला, तिच्या अभिनयासाठी. ते दोघंही खूप खूष होते त्या दिवशी. "वीणा, आज आपण डिनर ला जाऊया का? मस्त सेलिब्रेट करू!" तो म्हणाला. आणि तिने तिच्याही नकळत होकार देऊन टाकला. खूप जास्त खूष होता तो.

पुढचा पूर्ण वेळ तो फक्त त्याच्या डेट ची स्वप्न रंगवत होता तो. त्याने प्लेन पांढऱ्या टी शर्ट वर लाल काळ्या चेक्स चा शर्ट घातला होता. केसांना वॅक्स लावून छान सेट केले. तिच्यासाठी सुंदर अश्या लाल गुलाबांचा छोटासा हॅन्डबुके घेतला होता त्याने. mild perfume मारून तो आता घरातून बाहेर पडणारच तेवढ्यात त्याच्या मोबाईल ची मेसेज ची टोन वाजली. तिचाच मेसेज होता, "कौस्तुभ, i am really sorry, मी आज नाही येऊ शकत, आणि आत्ता जास्त बोलूही शकत नाही, भेटलो कि सविस्तर बोलू. bye." खूप खट्टू झाला तो मेसेज वाचून आणि तिला नक्की काही झालं नसेल ना या विचारात काळजीतही पडला होता.

बराच वेळ होऊन गेला तो तिच्या उशाशी बसून त्यांच्या चांगल्या आठवणीत रमला होता. अचानक मागून डॉ. अक्षत गुप्तांचा आवाज आला, तसा तो त्याच्या विचारतनं बाहेर आला. "ती कोमा मध्ये आहे, मला माहितीए हे पचवणं खूप अवघड आहे, पण काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल" बोलून ते निघून गेले. तो तसाच तिच्या उशाशी बसून राहिला, तिचा हात त्याच्या हातात घट्ट धरून...

क्रमशः

-        स्वर_अनुश्री 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रिय सखे - २

प्रिय सखे - १