पुनर्जन्म - २

अस्मि, मृण्मयी, सानिका, रेश्मा, मिहीर, मिथील, अक्षय.. ही सप्तर्षी... मुंबईत धुडगूस घालणारी... मुंबईला सळो कि पळो करून सोडणारी...अचानक काळजीत पडली... अस्मिला पडणाऱ्या स्वप्नांमुळे...

खरंतर त्या स्वप्नांत विशेष असं काहीच नव्हतं. पण का कुणास ठाऊक जरा विचित्र होतं. "एक मुलगी खिडकीत बसून रडतीये" असं स्वप्न पहिल्या रात्री पडलं. दुसऱ्या वेळी तीच खिडकी दिसली.. पण "रिकामी".... तिसऱ्या वेळी एक "पुजाऱ्याचे प्रेत"....काहीच कळेना. अस्मि तर विचार करून करून वेडी व्हायच्या बेतात होती. काय करायचं कुणालाच कळेना. शेवटी डोकेबाज मिथिलने आयडिया काढली. "आपण सगळे जण एका पिकनिकला जाऊ. जरा वातावरण बदललं की आपोआप अस्मिचा मानसिक ताण कमी होईल." ही आयडिया सर्वानुमते पास झाली. सर्वांनी मिथिलचे कौतुक केले. आणि लॉंग वीकेंड चा फायदा घेण्यासाठी ही सप्तर्षी दाखल झाली "पंचपर्णी" गावात....

गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार लागून सुट्टया होत्या खर्‍या पण शुक्रवारी "पंचपर्णी" गावात झालेल्या वादळामुळे हिरमूढ होऊन सर्वजण रात्रीपर्यंत मुंबईला परतले. रात्री, दमणूक झाल्यामुळे सर्वजण पटकन झोपून गेले. एकटी अस्मि मात्र जागी होती. दिवसभराच्या थकव्यापेक्षा तिला त्या मंदिराचीच आठवण येत होती. त्या मंदिराचा विचार करता करताच ती झोपून गेली. गाढ झोपी गेली.

सकाळी साडेआठ वाजता खणखणणाऱ्या फोनच्या आवाजाने मिहीर खडबडून जागा झाला...
 "हॅलो, कोण बोलतंय?" मिहीरनी जांभया देत विचारलं.
 "ए झोपाळू उठ. आज दहा वाजता आपल्या नेहमीच्या ठिकाणी..." पलिकडून आवाज आला, तोपर्यंत मिहीर पूर्णपणे जागा झाला होता.
 "रेशम्, anything serious?" मिहीरने विचारले.
 "Yeah, it is!" रेश्मा म्हणाली. "वेळेत पोहोच..." असं म्हणून तिने फोन कट् केला.

सकाळी दहा वाजता चौपाटीवर तसंही गर्दी नसते. ते सर्वजण त्यांच्या ठिकाणी पोहोचले. अस्मि डोकं धरूनच बसली होती. मिहीर धावत-पळत धापा टाकत पोहोचला. तो आल्यावर रेश्मा म्हणाली, "गाईझ, अस्मि ला काल आणखी एक स्वप्न पडलंय." 

सर्वजण आता गंभीरतेने या विषयाकडे पाहत होते. खरंतर स्वप्न पडणं ही नैसर्गिक, मानसिक गोष्ट आहे. दिवसभर आपण ज्या गोष्टी करतो, ज्या कल्पनांचा विचार करतो त्याच गोष्टी सहसा स्वप्नात दिसतात. पण अस्मिची स्वप्नं या संकल्पनेच्या बाहेरची होती. तिने कधीही न पाहिलेल्या घटना तिला स्वप्नात दिसत होत्या. ज्यांचा ती विचार करणं शक्यच नाही त्या घटना....

आणि अस्मिचं आत्ताचं स्वप्न तर अतिशय विलक्षण होतं. होय... तेच... तेच शंकराचं मंदिर.. पंचपर्णी गावातलं! 
आणि वेशीवरचा पडका वाडा... 
खिडकीत बसून रडणारी मुलगी..
रिकामी खिडकी..
पुजाऱ्याचे प्रेत..
महादेवाचे मंदिर..
पडका वाडा..

काहीतरी संकेत....
पण कसले? 

"Guys, I think we should try planchette!" शांततेचा भंग करत अक्षय म्हणाला.  "व्हॉट नॉन्सेन्स अक्षय??" सानिका जरा वैतागूनच म्हणाली. "मान्य आहे जरा विचित्र आहे हे सगळं.. पण म्हणून लगेच प्लॅनचेट? मला नाही मान्य हे." 

खरंतर कोणालाच मान्य नव्हतं, पण अस्मि ला पडणार्‍या स्वप्नांचा अर्थ लावण्यासाठी ते सर्व जण मान्य झाले. 
एरवी खरंतर अस्मिलाही हे मान्य नव्हतं पण आज ती काहीही करायला तयार होती....

पण काय निष्पन्न झालं होतं त्यातून? प्लॅनचेट मध्येही महादेवाच्या मंदिराचा रस्ता आणि पडका वाडा एवढेच क्लू मिळाले.... सगळेच निराश झाले.... आपण तिथून यायला नको होतं... त्या वाड्यात आणखी माहिती मिळाली असती.... एका रात्रीतच ही सप्तर्षी पुन्हा पंचपर्णीला निघाली - 
शोध घ्यायला...
गूढ उलगडायला...
स्वप्नांचा अर्थ लावायला...

© स्वर_अनुश्री

(छायाचित्र - गूगल)

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रिय सखे - ३

प्रिय सखे - २

प्रिय सखे - १