पांडुरंग कांती १ - "तोचि विठू महार"
माध्यान्हीची वेळ होती ती. उन्हं डोईवर आली होती. डोक्यावर सूर्य तेजाने तळपत होता. आणि अश्या तळपत्या दुपारी "ते" आपली स्नानसंध्या - पूजाअर्चा उरकून गाईला गोग्रास द्यायला गोठ्यात आले. त्यांचा नियमच होता तो. देवपूजा झाल्यावर गाईला गोग्रास द्यायचा. त्यानंतर कोणी आल्यागेल्या अतिथीची पूजा करायची. त्याला जेऊखाऊ घालायचं आणि मग स्वतः भोजन करायचे. आणि या दिनक्रमात जराही बदल होत नसे. आजही गोग्रास ठेवून माजघरात परतत असताना त्यांना समोरून एक जराजर्जर झालेला, भुकेने बेजार झालेला, हात पाय थकलेले तरीही कष्टी होऊन पुढे चालणारा, डोईवरचे केस पिकलेले आणि चेहेऱ्यावर सुरकुत्या आलेला एक वृद्ध गृहस्थ येताना दिसला. त्यांनी स्वतःहून पुढे होऊन त्या गृहस्थांची चौकशी केली. त्यांना समजलं, त्या गृहस्थांनी काही खाल्लं नव्हतं. त्यांचं हृदय कळवळलं. त्यांनी त्या गृहस्थांना आपल्या घरी नेलं. त्यांना जेऊ खाऊ घातलं. त्यांची समस्या दूर करायचा त्यांनी पूर्णपणे प्रयास केला.
सज्जनस्य हृदयं नवनीतं यद् वदन्ति कवयस्थ दलितं
अन्यदेह विलसत् परितापात् सज्जनो द्रवती नो नवनीतं||
(अर्थ : सज्जनांचं हृदय हे लोण्यापेक्षाही मऊ असतं. दुसऱ्याचं दुःख पाहून लोणी कधीच द्रवत (विरघळत) नाही पण सज्जनांचं हृदय मात्र विरघळतं.)
तर असे लोण्याहूनही मऊ अंतःकरण असणारे "ते" म्हणजेच मंगळवेढ्याचे "संत दामाजीपंत".
दामाजीपंत बिदरच्या सरकार दरबारीं कचेरीत कामाला होते. त्यांच्यासारखा इमानदार कारकून (आजच्या काळातील ऑफिसर) तेव्हां कोणीच नव्हता. मंगळवेढे व त्याच्या आसपासच्या गावांसाठी लागणाऱ्या धान्यांच्या कोठारांची जबाबदारी पंतांकडे होती. आणि अर्थातच ती त्यांनी अगदीच पुरेपूर निभावली होती. पंतांचा संसार, गृहस्थधर्मही अगदी व्यवस्थितपणे चालला होता. कचेरीतील कामे, देवाची पूजा, कुळधर्म-कुळाचार वैगेरे करण्यात पंतांचा काळ अगदी सुखात चालला होता.
चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात पंढरपूर, मंगळवेढे व त्याच्या आसपासच्या अनेक छोट्या छोट्या गावांत खूप मोठा दुष्काळ पडला होता. सगळ्यांचीच अन्नान्न दशा झाली होती. उपासमारीने अनेक निष्पाप लोकांचे जीव गेले. पाऊस कधी पडेल याची काहीच शाश्वती नव्हती. अश्यातच काही गावकरी आशेने पंतांकडे मदत मागायला आले. पंतांनाही एवढी मदत करणे शक्य नव्हते. पण गावकऱ्यांचे दुःख बघून पंतांचे मन भरून आले. त्यांनी आपल्या पत्नीशी सल्ला मसलत करून एक निर्णय घेतला व दुसऱ्या दिवशी धान्याची सर्व कोठारे गावकऱ्यांसाठी खुली केली. सर्व गावकऱ्यांनी पंतांना आशीर्वाद देत धान्य आपापल्या घरी नेले.
पंतांच्याच कचेरीमध्ये मुजुमदार नावाचा एक कानडी ब्राह्मण होता. तो बिदरच्या बादशहाच्या मर्जीतील होता. त्याने बादशहाकडे पंतांची कागाळी केली. व बादशहानी पंतांना अटक केले. पंतही स्वखुशीने कारावास भोगायला बिदर ला गेले. सतत ते पांडुरंगाचाच धावा करत होते.
ती त्यांची करुण हाक ऐकून पांडुरंगाचंही ह्रदय कळवळलं. भक्तांचा संसार चालवण्याचं ब्रीद घेतलेली माऊलीच ती. ती कशी शांत बसेल? त्याने रूप घेतलं. गोणपाट नेसलेल्या, खांद्यावर घोंगडे पांघरलेल्या, हातात काठी आणि एक छोटासा बटवा घेतलेल्या महाराचं. आणि पंढरपूरहून बिदरला निघणं झालं.
बिदरला पोचल्यावर आपण "विठू महार" आलो आहोत अशी सर्वत्र आरोळी देत तो बादशहापाशी पोचला. "ते मंगळवेढ्याचे दामाजीपंत आहेत ना, त्यांनी ध्यानाची कोठी फोडली आणि त्याचे पैसे द्यायला मला इथे पाठवलंय" असं म्हणत सुटला. हातातील छोटासा बटवा उलटा करू लागला. ते पाहून बादशहाही खो खो हसत सुटला. पण निमिषार्धात जेव्हा तिथे मोहोरांचा खच उभा दिसला तेव्हा मात्र बादशहाने तोंडात बोटं घातली. "विठू महार" काही नं बोलता निघून गेला.
बादशहाने पळत येऊन पंतांचे पाय धरले. माफी मागितली, व "तुमच्या पदरी असलेला विठू महार तेवढा मला दाखवा" असा आग्रह धरू लागला. पंतांनी त्याला समजवायचा पुरेपूर प्रयत्न केला पण निष्फळ. शेवटी पंतांनी विठ्ठलाचा धावा केला.
"निज रूप दाखवा हो, हरी दर्शनासी द्या हो"
विठ्ठलाने आपले मोहक रूप प्रकट केले. कानात मकरकुंडले, गळ्यात कौस्तुभमणी, सोन्यासारखे पिवळे पितांबर, कटेवर हात, विटेवरी उभा असा विठ्ठल प्रकट झाला. पण हाय !! बादशहाला हा नको होता. त्याला "विठू महार" हवा होता. तो काही मान्य होईना. पंत धावा करीतच होते.
"राज:भ्रमा पटू द्या प्रत्यक्ष एकवार
श्रीकृष्ण-विष्णू-राम तोचि विठू महार"
अखेरीस तो "विठू महार" प्रकट झाला. बादशहा अंतरी सुखी झाला. पंतांना अत्यानंद झाला. त्यांचा योग्य तो मानपान करुन सन्मानाने त्यांना मंगळवेढ्याला धाडण्यात आले. पंतांचे जीवन सार्थक झाले.
शब्दांकन : स्वर_अनुश्री
🙏🙏🙏🙏🙏
उत्तर द्याहटवा