अनाहत संगीत अकादमी

नाती.. काही नाती असतातच अशी, जी अचानक जुळतात पण कायमची. एकमेकांच्या मनात असलेलं एकमेकांचं अस्तित्व, भरभरून असणारं प्रेम, ओथंबणारी माया, डोळ्यातली शीतलता, एकमेकांची काळजी यांनी ओतप्रोत भरलेली असतात अशी नाती. या नात्यांना खरंतर काहीच नाव नसतं. नाव देऊच शकत नाही मुळी. 

मातापित्यानंतर ज्या नात्यांशी आपली ओळख होते.. गुरु-शिष्य, भाऊ-बहीण, मित्र-मैत्रीण हीच ती नाती.. ह्या नात्यांशी ओळख झाली अनाहत संगीत अकादमी मुळे. खरंतर शाळेत होते मी तेव्हा. जराशी बुजरीच. कोणाशीच जास्त बोलायचे नाही. समोरच्या व्यक्तीशी पूर्णपणे ओळख होईपर्यंत मी गप्पच असायचे. अनाहत संगीत अकादमी मध्ये माझा प्रवेश झाला. प्रवेश प्रक्रिया झाली आणि माझा क्लासही सुरु झाला. (खरंतर इथे मला नोंद करायला अत्यंत आनंद होतोय की माझी बालपणीची मैत्रीण रक्षा पाठक हिच्या संपर्कामुळे आणि सहकार्यामुळेच माझा प्रवेश होऊ शकला.)

संस्कृत मध्ये तात या शब्दाचा अर्थ वडील असा आहे. आमचे नावाने व अधिकाराने तात म्हणजे आमचे गुरुजी. अकादमी मध्ये गुरूंना म्हणजेच डॉ. रवींद्र घांगुर्डे गुरुजी यांना तात व डॉ. वंदना घांगुर्डे मॅडम यांना दीदी म्हणतात आणि तेही आपल्या विद्यार्थ्यांवर पुत्रवत माया करतात. एवढे मला त्या नकळत्या वयातही कळले होते. तेव्हापासून आत्तापर्यंत मला माझ्या गुरूंचे व माझी गुरु व मोठी बहीण सावनी ताईचे प्रेम मिळाले. 

पहिलाच आठवडा होता माझा क्लास चा. मी तशी तेव्हा बुजरीच होते. आजूबाजूला माझ्यापेक्षा अनुभवाने आणि वयाने मोठी मंडळी होती. समोर गुरुजींचे आसन. गुरुजींच्या एका बाजूला सरस्वतीची मोहक प्रतिमा, सुंदरसे मोरपीस मुकुटात खोवलेला भगवंत श्रीकृष्ण आणि कलेची देवता नटराजाची मूर्ती तर दुसऱ्या बाजूला दोन साधुपुरुष म्हणजेच तंबोरे. गुरुजींच्या समोरील भिंतीवर संगीतातील तीन तत्व व आमचे सद्गुरू "मा. दीनानाथ मंगेशकर" "डॉ. वसंतराव देशपांडे" "पंडित कुमार गंधर्व" यांच्या तसबिरी. त्या वयात मला खरंतर या सगळ्याचा अर्थ व मी किती भाग्यवान आहे हे कळत नव्हतं. आता मात्र जाणवतंय. गुरुजींनी मला पहिला प्रश्न विचारला, "तुला तंबोरा छेडता येतो का गं?" मी फक्तं मान हलवली. नकारार्थी! गुरुजींनी मला तंबोऱ्याची माहिती समजावून सांगितली. व माझ्या हाती तंबोरा दिला. "तुझ्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाने तंबोऱ्याची पहिली तार छेडायची आणि तर्जनीने बाकी तारा छेडायच्या व छेडताना हात सरळ व ताठ ठेवायचा." शब्द अजून कानात साठवून ठेवलेत मी. तेव्हापासून आत्तापर्यंत गुरुजी मला संगीताबरोबरच नीतीमूल्येही शिकवतात. अजून एक प्रसंग मला आठवतोय. गुरुजी शिकवत असताना अचानक म्हणाले "अनुश्री, जरा बाहेरचा दिवा लाव गं". मी उठले खरी पण समोर तर एवढी बटणं असलेला बोर्ड होता. भांबावले. यातलं नेमकं बटण कोणतं विचार करत असतानाच गुरुजी म्हणाले "तूझ्या डावीकडून तिसरं बटण!" केवढं उलगडून सांगितलं. समोरच्याला सहज सोपा मार्ग दाखवून त्याचा उद्धार करत असतात गुरुजी. गुरुजींकडून उत्तम संगीताचे सर्वांगीण ज्ञान मिळते. शिक्षण.. नव्हे संस्कार!

डॉ. वंदना घांगुर्डे दीदी.. खूप ऐकलं होतं यांच्याबद्दल. नाटकही पाहिलं होतं त्यांचं. पहिलंच नाटक पाहिलं ते संगीत सन्यस्त खड्गं...सुलोचना...माझं वय वर्ष पंधरा. खूप जास्त उत्सुकता वाढत होती दीदींबद्दल. कश्या असतील त्या? प्रत्यक्ष भेटीचा व बोलण्याचा योग मात्र अजून आला नव्हता. अश्यातच डॉ. वसंतराव देशपांडे मेमोरियल फौंडेशन चा संगीत महोत्सव आला. विद्यार्थ्यांनी त्यात कार्यकर्ते म्हणून सहभागी व्हावं. त्यातून त्यांना खूप काही शिकायला मिळेल आयुष्य सार्थकी लागेल असं आमच्या तात व दीदींना नेहमी वाटतं. मी नवीनच कार्यकर्त्यात रुजू झाले. माझी व दीदींची ओळख नसल्याने शिवाय दीदी मला पहिल्यांदाच पाहत असल्याने "ही कोणी नवीन मुलगी आली? ये ताई" असं म्हणत दीदींनी माझं स्वागत केलं. महोत्सव पार पडला. तात कडून शाबासकीची थाप मिळाली. अगदीच कृतकृत्य झाले मी. आणि तेव्हापासून मी दीदींना न्याहाळू लागले. त्यांचा स्टेज वरचा वावर, कलेबरोबरच तांत्रिक गोष्टींचा अभ्यास, आणि मुळात त्यांनी लिहिलेलं "ब्रीद तुझे जगी दीनानाथ" हे मा. दीनानाथ मंगेशकर यांचं सांगीतिक चरित्र वाचल्यामुळे मला खूप जास्त आपुलकी वाटू लागली होती दीदींबद्दल. अश्यातच एक दिवस माझा क्लास संपल्यावर "तुझं नाव अनुश्री ना? माझं एक काम आहे तुझ्याकडे" अशी दीदींची हाक आली. तेव्हापासून आत्तापर्यंत दीदींचा सहवास मिळातोय. दीदींचं systematic काम आणि कामातलं perfection हळूहळू शिकतीए मी. दीदींचा टापटीप पणा, हसमुख स्वभाव, सगळ्यांशी गोड बोलणे, आणि मुळात आम्हां मुलांकडून आधुनिक तंत्रज्ञान शिकून घेण्याची जिद्द खूप काही शिकवून जाते आम्हाला. 

"नाद अनाहत" या विशेषांकासाठी तात व दीदी यांची धडपड मी खूप जवळून बघितलीये. आणि त्याच "नाद अनाहत" या विशेषांकाची अक्षरजुळवणी व लेआउट मला करायला मिळतं हे माझं भाग्य. 

गुरूंच्या आशिर्वादामुळे अनेक मोठ्या लोकांचा सहवास आम्हाला मिळतो. त्यांचा सतत राबता असतो. असाच एक दिवस.. तात व दीदी यांच्या आशिर्वादामुळे मला भावगंधर्व पं. हृदयनाथजी मंगेशकर यांच्या प्रत्यक्ष भेटीचा योग आला. आम्ही तयारी करुन बाबांना (आम्ही सर्व विद्यार्थी भावगंधर्व पं. हृदयनाथजी मंगेशकर यांना आदराने बाबा असे म्हणतो) भेटायला गेलो. मला पाहिल्याक्षणी "वंदनाबाई, ही कोण छोटीशी मुलगी?" अशी त्यांनी विचारणा केली. व तद्नंतर "तू इंजिनीर आहेस, आणि गातेस पण? व्वा, गुरूंवर अशीच श्रद्धा ठेव. कल्याण होईल" असा आशीर्वादही दिला. त्यानंतरच्या (माझ्या भाग्यामुळे) प्रत्येक भेटीत मला अगदी प्रेमाने "अहो Engineer" अशीच हाक बाबा देतात. वंदना दीदी म्हणतात, अकादमीतील सर्व विद्यार्थी हे फक्तं विद्यार्थी नसून कार्यकर्ते आहेत आणि मंगेशकरी सुरांचे निस्सीम भक्त आहेत. कारण तात नी आमच्यावर अजाण वयापासून त्यांच्याच अलौकिक गायकीचे संस्कार केले आहेत. किती भाग्य आमचं!

अजून लक्षात आहे तो दिवस माझ्या. माझ्या शाळेचा प्रोजेक्ट होता. "व्यक्तिमत्व विकास" या सदराअंतर्गत मला एका "आदर्श व्यक्तिमत्वाची" मुलाखत घ्यायची होती. आणि सावनी ताई नुकतीच चेन्नई वरून रोकॉर्डिंग करून आली होती. स्वतः दमून आलेली असूनही माझ्यासाठी वेळ काढून ताईने मुलाखत दिली. ती खरंतर माझी व सावनी ताईची पहिली प्रत्यक्ष भेट. सावनी ताई मला बऱ्याच गोष्टी शिकवते. कधी समजावते, कधी रागावते, कधी हळूच चापटी मारते. पण ती माझ्यावर खूप जास्त प्रेम करते. मी रडताना जी मला स्वतःहून जवळ घेते, माझ्या डोळ्यात पाणी बघून तिच्याही डोळ्यात पाणी तरारतं. हे मला बघायला मिळालं हे माझं भाग्य. स्टेजवर पाऊल ठेवण्याआधीची सावनी ताई व स्टेजवर पाऊल पडल्यानंतरची सावनी रवींद्र ही तिची दोन्ही अंतरंगे मला (आम्हाला सर्वांनाच) अगदी जवळून अनुभवायला मिळतात. कधीतरी ओरडणारी आणि नंतर स्वतःच डोळे पुसून मला समजावणारी, खाऊ देणारी, सगळ्यांसोबत एकत्र बसून माझी खेचणारी, मस्करी करणारी सावनी ताई आणि आशिष जीजू. सोबत अकादमीचे मित्र मैत्रिणी, आम्हाला अगदी प्रेमाने सांभाळणारे तात आणि आमचे आवडीचे पदार्थ  आम्हाला प्रेमाने खायला घालणाऱ्या दीदी. नादब्रह्मात आलेली प्रत्येक व्यक्ती तृप्त होऊनच बाहेर पडते. 

निस्वार्थ मैत्रीही इथेच मिळाली मला.. मैत्रीत कधीकधी मतभेद हे होतच असतात पण ते सगळं विसरून पुन्हा एकत्र येणंही अनाहत संगीत अकादमीने च शिकवलं. कुठल्याही तथाकथित गोष्टींचा, जात-धर्म-पंथ-भाषा कशाचाच अडसर न येता घट्ट मैत्री इथेच जुळली. मैत्रीत एकमेकांसाठी जीव ओवाळून टाकणारे मित्र इथेच मिळाले. एकमेकांच्या प्रगतीसाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावणारे मित्र, जीवाला जीव देणारे मित्र, मित्राच्या सुखात सुख मानणारे मित्र फार कमी आणि अमूल्य असतात. तेच दिलेत मला अकादमीनं. सर्वच जण उच्चशिक्षित व आपापल्या क्षेत्रात उच्च पदावर आहेत पण सूर हा आमच्या सर्वांमधील एक धागा जो आम्हाला एकत्र जोडून ठेवतो. अर्थात हे आम्हां सर्वांवर तात दीदींनी केलेले संस्कार आहेत. तेच आम्हाला एक सुजाण माणूस व एक कलाकार बनवतात. खूप धन्यता वाटते अकादमीची विद्यार्थिनी असल्यात. खरंतर फक्तं माझे वैयक्तिक असे अनुभव व आठवणी लिहायच्या म्हणाल्या तरी मोठा प्रबंध लिहून होईल. पण अकादमीबद्दल लिहिताना शब्द थांबतच नाहीत म्हणून हा शब्दप्रपंच. तात, दीदी व ताई तुम्हांला शिरसाष्टांग वंदन. 


© - स्वर_अनुश्री

टिप्पण्या

  1. Wah...! Lihita yav tar anu sarkh aas vatal mala ha blog vachun... Apratim.. Kiti te sundar lihil ahes.. Khup Chan vatal vachun.. Keep writing.. 👌🏻👌🏻😍🙏🏻 Khup Shubhecha.

    उत्तर द्याहटवा
  2. U have such a bright mind... With fantabulous ideas a great one..... It's really heart touching.... Fab! 🤩🤩😍

    उत्तर द्याहटवा
  3. I always admire your writing skills you are amazing and the way you express is fabulous and extraordinary.🤗

    उत्तर द्याहटवा
  4. Khupach surekh lihile aahes ga..Kharach aapan sagale bhagywanch ki aapan Nadbrahma shi jodale gelo aahot..Keep on writing

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा