श्रीकृष्ण समजताना..

सद्हेतूने समष्टीच्या श्रेयसासाठी, कल्याणासाठी परमशक्तीला मनोगत आवाहन करून प्राशन केलेली जलांजली म्हणजे आचमन! शिवाजी सावंतांच्या युगंधर मध्येच वाचलंय मी हे. थोडक्यात काय तर हा लेख श्रीकृष्णार्पणमस्तु असं म्हणून मी या लेखाचा शेवट करेनही. पण तरीही लेखाच्या सुरुवातीला आचमन करून श्रीकृष्णाला आवाहन करण्याचा मोह आवरला नाही इतकच. खरंतर बालबुद्धीला आणि बालमनाला बालपणापासूनच रुचतो, भावतो, आवडतो तो श्रीकृष्णच.. त्याच्या त्या मोहक, त्रासदायक तरीही मनाला भावणाऱ्या बाललीला कोणाला नाही आवडत? आपल्या बालपणीचा पहिला सवंगडी हा श्रीकृष्णच असतो नाही का? आपल्याला मोठ्यांकडून काही कथा तर आवर्जून सांगितल्या जातात.. त्याच कथा ऐकत ऐकत लहानाचे मोठे होतो नाही आपण? भर तारुण्यात आल्यावरही तो श्रीकृष्ण जवळचा वाटतो. का कुणास ठाऊक पण अगदी तारुण्यात असलेल्या मुलीच्या मनात दडलेला स्वप्नातला राजकुमार हा थेट जाऊन श्रीकृष्णाशी साधर्म्य साधतो. दूर कुठेतरी पाचूसारख्या वनांमध्ये अलगद बासरी वाजवत बसलेला तो राजस, सावळी काया असलेला श्रीकृष्ण कोणत्या मुलीच्या मनात भरणार नाही सांगा ना? मनाच्या गाभ्यावर अलगदपणे मोरपीस फिरावं तसं श्रीकृष्णाचं अस्तित्व आहे. ते शोधण्यातही मजा आहे. बघण्यातही आनंद आहे आणि अनुभवण्यातही वेगळीच नशा आहे.

या निर्गुण निराकार भगवंताने सगुण साकार रूपात अवतार का घेतले, आणि यापुढेही घेत राहील हेही त्या श्रीकृष्णानेच उकल करून सांगितले आहे.
     परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।        
        धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥ 
साधूसंतांचा उद्धार करण्यासाठी आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी, आणि धर्माची विस्कटलेली घडी पुन्हा सुरळीतपणे बसवण्यासाठी मी प्रत्येक युगात जन्म घेत  राहीन असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात.

श्रीकृष्ण... एक बहुआयामी आणि आपल्या एकेका श्वासाबरोबर अधिक तीव्रतेने जाणवणारं तत्व आहे. ज्याची आठवण झाली की आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव होते. वास्तविक पाहता हरी आणि हर मध्ये फक्त एका वेलांटीचा फरक आहे. या संपूर्ण सृष्टीची निर्मिती करणारं ब्रह्म तत्व, सृष्टीचं पालनपोषण करणारा तो हरी, आणि या सृष्टीच्या लयाची जबाबदारी ज्याच्यावर आहे तो हर. तरीही उत्पत्ती, स्थिती आणि लय हे ज्याच्या आधीन आहेत तोच भगवान श्रीकृष्ण. द्वापारयुगापासून कलियुगापर्यंतचं त्रिकालाबाधित सत्य म्हणजे श्रीकृष्ण. युगानुयुगे सर्व स्त्री-पुरुषांच्या मनावर अधिराज्य गाजवणारं, ते मखमली, मुलायम मोरपीस म्हणजे श्रीकृष्ण !!!

श्रीकृष्णार्पणमस्तु!!


© - स्वर_अनुश्री
   ०१/१०/२०२०

टिप्पण्या

  1. खूप सुंदर लिहिले आहेस!!! कृष्णाचे रूपच काहीसे मोहक आहे नाही!!

    उत्तर द्याहटवा
  2. खूप छान लिहिलंय, मनापासून शुभेच्छा. असंच लिहित रहा.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रिय सखे - ३

प्रिय सखे - २

प्रिय सखे - १