श्रीकृष्ण समजताना...

                 कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो
                  लोकान्समाहर्तुमिह प्रवृत्तः ||

मी संपूर्ण जगताचा क्षय घडवणारा काळ आहे. होय मीच काळ आहे. दुष्ट लोकांचा संहार करण्यासाठीच मी येथे आलो आहे. असं भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत म्हणाले आहेत. हृदयाने हृदयाशी साधलेला संवाद म्हणजे हृद्गत. चराचरातील सर्व प्राणिमात्रांच्या हृदयात निवास करणारा तो हरी, त्याच्याशी साधलेला संवाद म्हणजे हृद्गत. त्याच हृदयस्थ वासुदेवाची अनेक रूपे आहेत. त्यातूनच श्रीकृष्ण तत्त्व अधिक स्पष्ट होतं. 

बालवयातच अनेक मोठ्या मोठ्या, क्रूर, दुष्ट राक्षसांचा संहार करणारा "लीलापुरुष" म्हणावा? सवंगडी व गोप एकत्र गोळा करून एकमेकांच्या खांद्यावर थर लावून, शिंकाळ्यातील दही, दुध, लोणी चोरणारा आणि तेच सर्व मित्रमंडळींमध्ये वाटून खाणारा "सात्विक नटखट चोर" म्हणावा? किशोरवयात रासक्रीडा करणारा तो "राजस सुकुमार" म्हणावा? नदीकाठी स्नानासाठी गेल्या असता गोपिकांची वस्त्रे पळवणारा "प्रणयी कुमार" म्हणावा? मानस भगिनी द्रौपदीला लज्जारक्षणास्तव वस्त्रे पुरवणारा "अलौकिक त्राता" म्हणावा? की "प्रेमळ भाऊ" म्हणावा? कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो असं म्हणणारा महाभारताचा नायक म्हणावा? खूपच अद्वितीय आणि अलौकिक रूपं आहेत त्याची.

अनंत काळापासून पृथ्वीच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडणारा तो हरी.. त्याच्या अलौकिक लीलांमुळे श्रीकृष्ण तत्त्वाचा मात्र देव्हाऱ्यातला देव झाला. प्राणिमात्रांच्या हृदयस्थ असणारा हा "युगंधर" मनाच्या देव्हाऱ्यातील "अच्युत" बनून आपल्या मानातच नांदतो आहे याकडे मात्र दुर्लक्ष झालं. रंध्रारंध्रातून सळसळणारं तत्त्व म्हणजे श्रीकृष्ण. श्र्वासाश्र्वासातून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणारं तत्त्व म्हणजे श्रीकृष्ण. 

या सृष्टीमध्ये प्रत्येक क्षणागणिक कितीतरी बदल होतात. पण अंत नसणारं जीवन मात्र अगदीच अखंड राहतं. तद्वत, आजच्या या शास्त्र-विज्ञानाच्या युगातही अनेक बदल झाले आहेत. अजूनही होत आहेत. पुढेही होत राहतील. पण अनादि अनंत असणारा तो मात्र अखंड आहे. या तरंगवादाचा नायकही तोच आहे. ज्याला कोणताही आदि नाही ज्याला कोणताही अंत नाही असा तो श्रीकृष्ण मात्र चिरंतन होता, आहे आणि पुढेही राहील. देव्हाऱ्याच्या चौकटीतल्या वासुदेवापेक्षाही प्रत्येक प्राणिमात्रांच्या मनमानातला युगंधर बनून तो असाच चिरंतन नांदत राहील यात शंका नाही.. 

श्रीकृष्णार्पणमस्तु. 
© - स्वर_अनुश्री
   १९/१०/२०२०

टिप्पण्या

  1. अप्रतिम अनु, अतिशय सुरेख लिहिलं आहे. शुभेच्छा.

    उत्तर द्याहटवा
  2. खुप सुंदर.... छान लिहले आहे असच लिहीत रहा... !!!!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रिय सखे - ३

प्रिय सखे - २

प्रिय सखे - १