प्रिय सखे - २

     'आय लव्ह यू कौस्तुभ...' ती हळुवारपणे त्याच्या कानात म्हणाली, तसा तो एकदम शहारून गेला. जे ऐकण्यासाठी गेली दोन वर्षं त्याचे कान आसुसले होते, तेच ऐकत होता तो आज. हे नक्की खरंय कि स्वप्न, हे काही त्याला समजत नव्हतं. विचाराच्या भरातच त्याने एकदम स्वतःला चिमटा काढला आणि स्वतःच दचकला. ते बघून ती एकदम खळाळून हसली.

    काळ्या रंगाच्या वन पीस मध्ये ती एकदमच सुरेख दिसत होती. जेमतेम गुडघ्यापर्यंत असेल तिच्या तो किंवा कदाचित त्याहूनही छोटा असेल. पण तिच्या अंगावर तो एवढा सुरेख दिसत होता. त्यातून तिने लावलेल्या लिपस्टिक ची शेड तर तीच सौंदर्य अजूनच जास्त खुलवत होती. आत्ताच जेवण केल्यामुळे तशी ती फिकट झाली होती, पण तरीही तिचे ओठ खूपच नाजूक दिसत होते. तो तिच्याकडे बघतच राहिला. अवघ्या काहीच क्षणांपूर्वी तिने त्याच्याजवळ तिच्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यामुळे ते दोघंही एकदम खुश होते.

    'आपण थोडावेळ फिरायला जाऊया?' त्याने एकदम शांततेचा भंग करत विचारलं. 'अं, खूप उशीर झालाय रे, मला घरी पण जायचंय.' ती पटकन म्हणाली. 'थोडा वेळ, अगदी थोडाच वेळ' तो एकदम क्युट तोंड करत म्हणाला तसं तिला अजून नाही म्हणणं जीवावर आलं, आणि तिने हसूनच मान हलवली. चालत चालत ते गाडीपर्यंत आले, तसं आधी त्याने दार उघडून तिला गाडीत बसवलं आणि दुसऱ्या बाजूने स्वतः जाऊन बसला. हळूच तिच्या बाजूने झुकून तो तिच्या अजून जवळ गेला. एवढा की अगदी त्याचे ओठ तिच्या गालापासून अगदीच जवळ होते. तिने एकदम तिचा श्वास रोखून धरला. धडधड अचानक वाढली तिची. दोन मिनिट तिच्या डोळ्यात खोलवर बघत राहिला तो, तसे तिने डोळे घट्ट मिटून घेतले. तो अजून जवळ आला आणि थोडं पुढे झुकून त्याने सीट बेल्ट ओढला, तिला सीट बेल्ट लावला आणि सरळ होऊन तिच्याकडे बघत बसला. दहा सेकंदांनी तिने डोळे उघडले तर तो तिच्याकडे बघतच हसत होता. एकदम खट्टू झाली ती ते बघून. "शी, असं कसं वाटलं मला कि तो मला किस...." विचारात सुद्धा ती एकदम गप्प बसली.

    जवळ जवळ रात्रीचा एक वाजून गेला होता, तरीही ते दोघे फिरतच होते. खूप दूर कुठेतरी शहराबाहेर आले ते. रात्रीची धुंद हवा आणि गुलाबी थंडी यामुळे आता इथून परत घरी जावंसंच वाटत नव्हतं. एका मोठ्या झाडापाशी गाडी लावून ते दोघे बसले होते, त्या अथांग आणि अशांत आकाशाकडे बघत! जणू काही तो त्या चांदण्याच्या मंद प्रकाशात त्या आकाशालाच सांगत होता, जेवढा अथांग तू आहेस, तेवढंच अथांग आमचं प्रेम आहे.

    आता मात्र बराच उशीर झाला होता. हळू हळू थंडीही वाढली आणि रात्रीचा वेढा अजून गूढ व्हायला लागला, तशी ती अस्वस्थ झाली. कौस्तुभ, मला भीती वाटतीये, आपण घरी जायचं का? तिने घाबरल्या स्वरात विचारलं आणि तो भानावर आला. दोघंही गाडीत बसले, आणि परतीचा रस्ता धरला.

    ती घाबरलीच होती अजूनही. नक्की काय झालंय, हे तीचं तिलाही समजत नव्हतं. पण एक खूप अनामिक भीती वाटत होती तिला. भीतीच्या भरातच तिने त्याला एकदम प्रश्न केला, तू मला कधीच सोडून नाही ना जाणार? आणि तो एकदम चमकला. अचानक असा प्रश्न का केला असेल तिने, तिला सोडून जाणार? कल्पनेने क्षणभर तोही घाबरला, पण मग अचानक सावरून म्हणाला, वीणा, आज या अथांग आकाशाची शपथ घेऊन मी तुला सांगतो, कि काहीही झालं तरी मी तुला कधीच सोडून जाणार नाही, यापुढचं आयुष्य आपल्याला एकत्रच घालवायचं आहे. त्याचे ते हळुवार प्रेमळ शब्द ऐकले, तशी ती जरा शांत झाली.

    त्याने हळुवारपणे तिच्याकडे बघितलं, तिचा हात एका हातात घट्ट धरला आणि तिच्या बाजूला झुकून तिच्या कपाळावर त्याने एकदम शांतपणे ओठ ठेवले, खूप हायसं वाटलं तिला आणि तिने त्याचा हात अजून घट्ट धरला. त्या दहा सेकंदात काय झालं ते त्यालाही समजलं नाही. पण... पण अचानक मोठ्या ट्रक चा हॉर्न आला समोरून. जोरात जर्क देत स्टीइअरिन्ग हलवून त्याने गाडी वाचवायचा खूप प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. पुढच्या क्षणाला त्याची गाडी त्या ट्रकला जोरदार धडकली. सगळ्या काचा फुटून विखरल्या होत्या, गाडीला सुद्धा बरीच हानी झाली होती, पूर्ण अस्ताव्यस्त पडली होती, त्यालाही बरंच लागलं होतं. तश्याच परिस्थितीत त्याने पाहिलं, गाडी उलटली तशी थ्रो होऊन ती जोरात बाहेर पडली होती. तिच्या डोक्याला बराच मार लागला होता. धडपडतच हो तिच्यापाशी गेला आणि तिला उचलणार तेवढ्यात त्यालाही एकदम भोवळ आली.

    जवळ जवळ 48 तास होऊन गेले होते, त्याला जाग आली, तेव्हा तो 'सोहन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल' मध्ये ऍडमिट होता. अंगावर बऱ्याच जखमा होत्या त्याच्या. डोक्यालाही जरा मार लागला होता. पण तश्या अवस्थेतहि, त्याने तिथल्या नर्स ला तिच्याबद्दल विचारलं, आणि ती नाही नाही म्हणत असतानाहि पळत तो हॉस्पिटल मधल्या तिच्या खोलीपाशी आला. डोक्याला खूप मार लागला होता तिच्या, रक्तस्त्राव पण खूप झाला होता. निरनिराळ्या नळ्या तिच्या शरीरात घुसवल्या होत्या. शुद्धीत नव्हती ती, आणि येण्याची काही चिन्हहि दिसत नव्हती. 'शी इस इन कोमा!' मागून त्याच्या खांद्यावर हात ठेवत, डॉ. अक्षत गुप्ता म्हणाले, आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली...

    वीणा! एकदम ओरडत तो झोपेतून जागा झाला. आज पुन्हा एकदा आठवण झाली त्याची. इतके वर्ष ती सोबत नव्हती त्यामुळे दुःख दाबून तरी ठेवता येत होतं. पण आता मात्र रोजच ती समोर दिसेल. आय मिस यु वीणा!! रात्रभर तसंच तिच्या आठवणीत तो फक्त कूस बदलत राहिला...

क्रमशः

- स्वर_अनुश्री


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रिय सखे - ३

प्रिय सखे - १